छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मनपा निवडणुकीच्या दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या आदेशाने आकाशवाणी चौक खुला करण्यात आला होता. यामुळे जालना रोडवर वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. अखेर पोलिसांनी मंगळवार (दि.३) पासून चौक पुन्हा बंद केला. यामुळे येथील वाहतूक कोंडीच्या त्रासापासून वाहनधारकाची मुक्तता झाली.
जवाहरनगर परिसरातील नागरिकांच्या मतांसाठी ऐन प्रचाराच्या धामधुमीत पालकमंत्री शिरसाट यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून आकाशवाणी चौक खुला करण्याचा हुकूम सोडला होता. त्यानुसार ९ जानेवारीला चौक खुला होताच पालकमंत्री, त्यांचे उमेदवार, कार्यकर्ते यांनी भरचौकात ढोल-ताशे वाजवून, फटाके फोडून स्वतःचे बोल बडबले. त्यानंतर राष्ट्रवादी, भाजपच्या नेत्यांनीही हाच मार्ग अनुसरत श्रेय लाटले. परंतु ज्या उमेदवारांच्या मदतीसाठी पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतला ते उमेदवार पराभूत झाले. दुसरीकडे वाहतुकीचाही बट्ट्याबोळ झाला. नेहमी आकाशवाणी चौकातून थेट सेव्हनहिलपर्यंत वाहनाच्या रांगा लागत होत्या. यामुळे पोलिसांनी मंगळवारपासून हा चौक पुन्हा एकदा बॅरिकेट्स लावून बंद केला.









